रामदास आठवलेंच्या पक्षाला तामिळनाडूच्या निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर, तर ४ राज्यांसाठी कपबशी चिन्ह

मुंबई : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही त्यासाठी सज्ज झाला आहे. रिपब्लिकन पक्षही पाचही राज्यांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आठवले यांच्या पक्षाला चिन्ह देखील दिलं आहे. निवडणूक आयोगाने आठवले यांच्या पक्षाला चार राज्यांसाठी कपबशी तर एका राज्यासाठी हेलिकॉप्ट चिन्ह दिलं आहे.
तामिळनाडू, पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी या सर्व राज्यांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनंतर आता निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला निवडणूक लढण्यासाठी चिन्हं जाहीर केली आहेत. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या चार राज्यांमध्ये कपबशी हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर तामिळनाडूसाठी हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आलं आहे.
दरम्यान, या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष चांगला प्रचार करून यश मिळवेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच आगामी 5 राज्यांपैकी तामिळनाडू या एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तामिळनाडूतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना एक निवडणूक चिन्ह मिळाल्याने तामिळनाडूत ही रिपब्लिकन पक्ष चांगली कामगिरी करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
उद्योगपती कृष्णमिलन गजानन शुक्ला यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती
आगामी पाच राज्यांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्योगपती आणि समाजसेवक कृष्णमिलन गजानन शुक्ला यांची रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. कृष्णमिलन शुक्ला हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. शुक्ला यांनी आठवलेंनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.