
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही मुंबईकरांच्या लोकल प्रश्नाला हात घातला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ज्या नागरिकांना, प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज यांनी पत्रातून केली आहे.
ज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधात सूट देण्याचा विचारही असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे लोकल मागणी केली आहे.
मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे, असे ट्विट राज यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही जोडले आहे.
दरम्यान, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच, लोकलबाबतही दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना मुभा देण्याचा विचार सुरू असल्याच आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर, आता राज ठाकरेंनीही याबाबत पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे.