राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राजकीय पर्यटन; भाजपचे टीकास्त्र
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. लवप्रीतने दिलेलं बलिदान कधीही विसरणाऱ नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. तसेच, जोपर्यंत पीडित कुटुंबीयास न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालूच राहिल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला आहे. यानंतर आता केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचा लखीमपूर खिरी येथील दौरा हा फक्त राजकीय पर्यटनाचा एक नमुना आहे, असं म्हटलं आहे.
गिरीराज सिंह यांनी जिथे जिथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना संधी मिळते तिथे तिथे ते आपल्या राजकीय पर्यटनासाठी जातात. राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. तसेच माझा एक प्रश्न आहे. राहुल गांधींनी लखीमपूरमधील त्या घटनेत मारल्या गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला भेट का दिली नाही? त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही? असा सवाल देखील गिरीराज सिंह यांनी विचारला आहे.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लवप्रीतच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. काही दिवसांपूर्वी मोदी राहुल यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत, असं म्हणत निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी काही दिवसांपासून देशातील शेतकऱ्यांवर सरकार आक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजप नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत, असं म्हटलं होतं.