राजकारण

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भाजप नेत्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण

श्रीगंगानगर: राजस्थानच्या गंगानगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचे कपडे शेतकऱ्यांनी फाडल्याचा प्रकार घडला आहे. राज्यातील काँग्रेस सरकारविरोधात भाजप करत असलेल्या जिल्हास्तरीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी एससी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकऱ्यांनी मेघवाल यांचे कपडे फाडले. गंगासिंह चौकात हा प्रकार घडला.

भाजप नेते कैलाश मेघवाल पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असताना हा प्रकार घडला. भाजप करत असलेल्या आंदोलन स्थळापासून काही अंतरावर शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत होते. तेव्ह शेतकऱ्यांना मेघवाल दिसले. त्यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं होतं. मोदी सरकारविरोधात घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांनी मेघवाल यांना घेराव घातला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हलका लाठीमार केला. त्यात किसान मोर्चाच्या काही शेतकऱ्यांना दुखापत झाली. सध्याच्या घडीला श्रीगंगानगरमधील जिल्हाधिकारी कार्यालय, महाराजा गंगा सिंह चौक आणि भगत सिंह चौक रोड परिसरात तणावाचं वातावरण आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

जनहिताच्या विविध मुद्द्यांवर भाजपनं राज्य सरकारविरोधात सेंट्रल जेल परिसरात आंदोलन केलं जात आहे. तर महाराजा गंगा सिंह चौक परिसरात केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. भाजपच्या आंदोलनाला जात असलेल्या कैलाश मेघवाल यांना शेतकऱ्यांनी घेराव घालून धक्काबुक्की केली. भाजप नेत्यावर हल्ला होऊन त्याचे कपडे फाडण्यात आल्याची ही आठवड्यातली दुसरी घटना आहे. याआधी ५ दिवसांपूर्वी असाच प्रकार जयपूर-दिल्ली द्रुतगती मार्गावरील शहाजापूरमध्ये घडला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button