
नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता उत्तर प्रदेशात स्वतः प्रचार करणार आहेत. ७ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी बिजनौरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मोदींची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पंतप्रधान मोदी बिजनौरमध्ये फिजिकल हायब्रीड रॅली घेणार आहेत. यादरम्यान ते ३ जिल्हे कव्हर करतील. यामध्ये बिजनौर, मुरादाबाद, अमरोहा जिल्ह्यांतील १८ मतदार संघांसाठी प्रचार करण्यात येणार आहे. यादरम्यान, निवडणूक आयोगाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास एक हजार कार्यकर्ते या रॅलीचा सहभागी होतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सर्व लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील.
उत्तराखंडमध्येही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजल्यापासून उत्तराखंडच्या जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. यामध्ये हरिद्वार आणि डेहराडून या २ जिल्ह्यांचे लोक सहभागी होतील. या दोन जिल्ह्यांमध्ये जवळपास १४ विधानसभा मतदार संघ आहेत.
यंदा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ४०३ जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये १० फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी, २० फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात ५९ जागांसाठी, २३ फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात ६० जागांसाठी, २७ फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात ६० जागांसाठी, ३ मार्चला सहाव्या टप्प्यात ५७ जागांसाठी आणि ७ मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात ५४ जागांसाठी मतदान होणार आहे.