राष्ट्रपती रामनाथ कोविंद एम्समध्ये दाखल; बायपास करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रपती भवनकडून अधिकृत निवेदन दिले आहे. त्यात राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर असल्याचे नमूद केले आहे. 27 मार्च रोजी दुपारी राष्ट्रपतींना दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS, Delhi) दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी राष्ट्रपतींना बायपास प्रक्रिया (Bypass Procedure) पार पाडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारी त्यांच्यावर एम्समध्ये नियोजित बायपास प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते आहे.
राष्ट्रपती भवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याचप्रमाणे सध्या ते एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. शुक्रवारी सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांकरता त्यांना एम्समध्ये पाठवण्यात आले. दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुलाकडे त्यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली होती. भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले होते कि, ‘राष्ट्रपतींच्या नियमित वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांकडून त्यांची देखरेख केली जात आहे. त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचे राष्ट्रपतींनी आभार व्यक्त केले आहेत.’