‘निराली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी
नवसारी : नवसारी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आली. ‘लार्सन अॅंड टुब्रो’चे अध्यक्ष ए. एम. नाईक यांच्याकडून वैयक्तिकरित्या स्थापन होणाऱे हे रुग्णालय ‘ए. एम. नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स’ येथे उभारण्यात येत आहे. या कॉम्प्लेक्सच्या सुमारे आठ एकर जागेत बांधण्यात आलेल्या ‘निराली कर्करोग रुग्णालया’चे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्याच्या शेजारीच हे नियोजित ‘निराली मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय’ उभारले जात आहे. ‘नाईक मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’ (एनएमएमटी) या संस्थेच्या माध्यमातून नाईक यांनी दीर्घकाळ लोकोपयोगी व धर्मादाय कामे करून गौरव प्राप्त केला आहे. ही ट्रस्ट आरोग्य व समाजकल्याण या संदर्भातील कामे करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आली आहे.
पायाभरणी समारंभास ‘लार्सन अँड टुब्रो’चे अध्यक्ष ए एम नाईक, ‘लार्सन अँड टुब्रो’चे सीईओ व एमडी एस. एन. सुब्रह्मण्यन, ‘निराली मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’च्या संचालक मंडळाचे सदस्य जिग्नेश नाईक आणि ‘लार्सन अँड टुब्रोचे’ एमडी व सीईओ यांचे सल्लागार वाय. एस. त्रिवेदी, नवसारीचे खासदार सी. आर. पाटील, गुजरात राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री ईश्वरभाई परमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रुग्णांमधील निदान आणि उपचारांमधील अनिश्चितता दूर करण्यासाठी, सर्वसमावेशक उपचारांस उत्तेजन देण्यासाठी, वेदना व त्रास कमी करण्यासाठी आणि रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी आपली क्षमता वाढविण्याचे या ट्रस्टकडून सतत प्रयत्न होत असतात.
याप्रसंगी बोलताना ‘लार्सन अँड टुब्रो’चे अध्यक्ष ए. एम. नाईक म्हणाले, “सामाजिक सेवेची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली, तर आरोग्यसेवेमध्ये उतरण्याची दिशा माझी नात निराली हिच्यामुळे मिळाली. माझ्या जन्मभूमीत आरोग्यसेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करून मी माझा काही वेळ, माझी शक्ती आणि संपत्ती गरजूंच्या हितासाठी वापरू शकलो, याचा मला अभिमान आहे.”
‘एडलगिव्हहुरुन इंडियाच्या परोपकार यादी 2020’मध्ये ‘भारतातील सर्वात उदार व्यावसायिक व्यवस्थापक’ म्हणून उल्लेख असणारे नाईक यांनी, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य-निर्मिती या क्षेत्रांत लोकोपयोगी स्वरुपाची कामे केली आहेत.
“निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ची पायाभरणी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाली, हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. हे रुग्णालय पूर्ण आणि कार्यान्वित झाल्यावर, संपूर्ण दक्षिण गुजरातमधील हे सर्वोत्कृष्ट आणि परवडणारे टर्शिअरी स्वरुपाचे आरोग्य केंद्र असेल, अशी माझी खात्री आहे”, असे नाईक म्हणाले.
आरोग्यसेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अपोलो हॉस्पिटल्सतर्फे निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यात येणार आहे. पाचशे खाटांचे हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी आणि अनुभवी डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांच्या समर्पित सेवांनी सुसज्ज असणार आहे. एंडोक्रिनोलॉजी, मूत्रपिंड व मधुमेह यांवरील उपचार, श्वसनविषयक औषध आणि नियमित आरोग्य तपासणी यांसह विस्तृत सेवा येथे उपलब्ध असतील. पोटातील विविध आजार, मूत्रसंस्थेतील आजार, हृदयरोग आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधिचे आजार, नवजात शिशूंची काळजी व बाल विकृती, प्रसूती व स्त्रीरोग, हाडांचे आजार यांवरील उपचार व प्रगत शस्त्रक्रिया, तसेच आपत्कालीन सेवा, गंभीर आजारांवरील उपचार, आघात झाल्यानंतरची काळजी यांसारख्या सेवा या रुग्णालयात मिळू शकणार आहेत.
‘निराली मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट’तर्फे मुंबईतील पवई येथे मल्टि-डायग्नोस्टिक मेडिकल सेंटर, सूरत येथे रेडिएशन सेंटर आणि अनेक ग्रामीण जिल्ह्यांत सेवा देणारी मोबाइल मेडिकल युनिट्स यांची उभारणी आतापर्यंत करण्यात आली आहे.