अर्थ-उद्योगराजकारण

मुंबै बँक गैरव्यवहार – कर नाही तर डर कशाला : प्रवीण दरेकर

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेतील १२३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने तपासच केलेला नाही, अशा शब्दांत महानगरदंडाधिकाऱ्यांनी पोलीस तपासाच्या कार्यपद्धतीबाबत ताशेरे ओढले होते. या प्रकरणाचा पुनर्तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर मुंबै बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मी गायब होणारा नेता नाही, कर नाही तर डर कशाला, या शब्दांत भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

मुंबै बँकेत १२३ कोटींचा घोटाळा, हा आकडा कुठून आणला तेच कळत नाही. केवळ हवेत तीर मारले जात आहेत. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असल्याने माझ्यावर दबाव टाकण्यासाठी व मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. मात्र मी कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. एकदाच काय शंभर वेळा चौकशीला सामोरा जायला तयार आहे, असे दरेकरांनी स्पष्ट केले आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबै बँकेवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले.

प्रत्येक बाबतीत आवाज उठवणारा दरेकर आता कुठे गायब झाला आहे, असे विचारले जात आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मुंबै बँकेवर जे आरोप केले जात आहेत त्यामागे केवळ आणि केवळ राजकारण आहे. हे राजकीय सूडापोटी चौकशी करून काही हाती लागतंय का हे बघत आहेत. जाणीवपूर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण यातून काहीच साध्य झाले नाही, असे दरेकर म्हणाले.

मुंबई बँक ही अ वर्ग असणारी बँक आहे. विधिमंडळाच्या सभागृहात बँकेचे कौतुक झालेले आहे. नाबार्डने देखील आमचे कौतुक केले आहे. पण सध्या ज्या काही चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत त्याने बँकेची बदनामी होत आहे. याबाबत अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, अशी माहिती देत बँकेविरोधात ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. जे जे आरोप आमच्यावर झाले त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर दिले आहे, असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

मला जितके अडचणीत आणण्याचा प्रयत्न कराल, तितका मी आक्रमकपणे प्रश्न मांडत राहीन. दबावाला घाबरणारा मी नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, मी त्यास सामोरा जायला तयार आहे, असे स्पष्ट करताना बँकेवरचा विश्वास ग्राहकांनी कायम ठेवावा. जनतेच्या आणि सहकाराच्या सेवेसाठी मुंबै बँक सदैव तत्पर आहे, असेल आणि राहील, असे आवाहन दरेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button