प्रवीण दरेकर यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात?; राष्ट्रवादीकडून भाजपची कोंडी

मुंबई : मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकरांच्या सहकार पॅनेलनं २१ जागा पटकावत विजय मिळवला आहे. मात्र दरेकरांच्या आनंदावर विरजन पडलं आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने ‘मजूर’ म्हणून अपात्र ठरवले आहे.
मुंबई बँकेचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागत असताना प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने ‘मजूर’ म्हणून अपात्र ठरवले आहे. १९९७ सालापासून मुंबई बँकेचे संचालक पदी प्रवीण दरेकर ‘मजूर’ या प्रवर्गातून निवडून येत होते. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. सहकार कायदा १९६० च्या २०२१ च्या लेटेस्ट पुस्तकात पान ३६९ वर सहकार कायदा ७८ अ मध्ये मजूर किंवा सदस्य अपात्रतेचा मुद्दा सुस्पष्ट आहे. या कलमातील तरतुदीनुसार अपात्र सदस्य जो बँकिंग क्षेत्रातील आहे तो १ वर्षाकरता कोणत्याही व्यवस्थेतून सदस्य राहू शकत नाही अशी स्पष्ट तरतूद दिलेली आहे अशी माहिती आपचे धनंजय शिंदे यांनी दिली आहे.
सहकार विभागाने अपात्र ठरवल्यानंतर राष्ट्रवादीने प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सहकार विभागाने अपात्र घोषित केलेले, लोकांची फसवणूक करणारे, स्वतःला मजूर म्हणवणारे आणि प्रतिज्ञापत्रात उद्योजक दाखवणार्या प्रविण दरेकर यांना सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी तात्काळ विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
तपासे यांनी म्हटलंय की, मुंबै बॅंक निवडणूकीत स्वतःला मजुर म्हणायचं व विधानपरिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उद्योजक असल्याचं दाखवायचं अशी धूळफेक फक्त भाजपचे नेते प्रवीण दरेकरच करु शकतात. केंद्रात सहकारमंत्री व गृहमंत्री अमित शहा आहेत. राज्याच्या सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना अपात्र घोषित केले आहे. आता दरेकर कुठली नैतिकता वापरणार आहेत. भाजप पक्षाचा एक जबाबदार नेता जनतेच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असेल तर भाजपकडे नैतिकता कुठे आहे असा घणाघाती सवालही राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी विचारला आहे.