कोकणवासीय सत्ताधाऱ्यांना कोल्हापुरी दाखवतील; दरेकरांचा नवाब मालिकांवर हल्ला

मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ३ दिवस पाहणी दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जात नुकसानाचा आढावा घेतला. या दौऱ्यावरुन आता भाजप आणि सत्ताधारी आघाडीमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावर अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. मलिकांच्या टीकेला आता दरेकर यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलंय.
नवाब मलिक टीका करतात आणि विरोधी पक्षाच्या कोकणातील पाहणी दौऱ्यावर टीका करतात. मलिक आमच्या बुटांबाबत बोलतात. आम्ही बुट घातले की सुट घातले, हे नवाब मलिक बोलतात. आम्ही पाहणी करायची आणी यांनी घरात बसायचं. यापेक्षा लोकशाहीची थट्टा असू शकत नाही. नवाब मलिकांनी आमचे बुट पाहण्यापेक्षा कोकणात जा. कोकणची जनता तुम्हाला कोल्हापूरी चप्पल दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढा संताप कोकणच्या जनतेच्या मनात आपल्याविषयी झाल्याचं दिसत आहे, अशा शब्दात दरेकर यांनी नवाब मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय.
काय म्हणाले होते नवाब मलिक ?
विरोधकांना दौरा करायचा ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत. पंचनाम्याच्या आधारावर मदत जाहीर होते. किती किलोमीटर गेले, पायी किती गेले, किती दौरे केले हे आम्ही विरोधकांना विचारत नाही. विरोधक फिरत असताना दोघांचे एकसारखेच होते. बूट एकसारखे घालतात, बूट खरेदी करतात, बूट नवे खरेदी करावे लागतात. यांचे बूट ‘नायके’चे की ‘पुमा’चे हे ठाऊक नाही पण नटून जात आहे. मुंख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीका केली होती.