मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी भाजपवर शेलक्या शब्दात हल्ला चढवला. महाराष्ट्रासह केंद्रीय भाजप नेतृत्वावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खास पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली. फडणवीस यांनी ठाकरेंचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला जोरदार टोला हाणलाय. राऊतांच्या या ट्वीटवरुन आता भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी राऊतांना शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. पूनम महाजन यांनी ‘दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती’ असे चोख उत्तर दिले त्यामुळे राऊतांना ट्वीट डिलीट करावे लागले.
संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका चित्रावर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसंच बाजूला एक स्टूलही आहे. त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘हॅव अ सीट’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. हे व्यंगचित्र शेअर करताना ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असं कॅप्शन दिलं आहे.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
राऊतांनी ट्वीट केलेल्या या व्यंगचित्रावरुन भाजप खासदार पूनम महाजन यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांच्या या ट्वीटला रिट्वीट करत पूनम महाजन यांनी ‘स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’, असं प्रत्युतर दिलंय.