पेट्रोल डिझेलच्या दरात ४ दिवसांत दीड रूपयांची वाढ
मुंबई : पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. रविवारी पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ दिसून आली. ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचं झालं तर काही दिवस सोडले तर इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची वाढ होऊन दर १०५.८४ रूपये प्रति लीटर या विक्रमी स्तरावर पोहोचले. तर डिझेलचे दर ९४.२२ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत.
चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात ३४ पैशांची वाढ होऊन ते १११.७७ रूपये प्रति लीटरवर पोहोचले, तर डिझेलमध्ये ३७ पैशांची वाढ होऊन ते १०२.५२ रूपये प्रति लीटरवर पोहोचले.
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा हा सलग चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांमध्ये इंधनाच्या दरात १.४० रूपयांची वाढ झाली. यापूर्वी १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. तीन आठवड्यांमध्ये १६ वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरानं यापूर्वीच शंभरी गाठली होती, परंतु आता अनेक ठिकाणी डिझेलच्या दरानंही शंभरी गाठली आहे.
इंधनाचे आजचे दर
दिल्ली: पेट्रोल – ₹ १०५.८४ प्रति लीटर; डिझेल – ₹ ९४.५७ प्रति लीटर
मुंबई: पेट्रोल – ₹ १११.७७ प्रति लीटर; डिझेल – ₹ १०२.५२ प्रति लीटर
कोलकाता: पेट्रोल – ₹ १०६.४३ प्रति लीटर; डिझेल – ₹ ९७.६८ प्रति लीटर
चेन्नई: पेट्रोल – ₹ १०३.०१ प्रति लीटर; डिझेल – ₹ ९८.९२ प्रति लीटर