Top Newsराजकारण

२५ जिल्ह्यांमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी; ११ जिल्ह्यांत निर्बंध कायम

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत अद्याप निर्णय नाही

मुंबई : राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी राज्य सरकारकडून अधिकृतपणे आदेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार २५ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येतील. तर शनिवारी आणि रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागणार. उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार तर शनिवार-रविवारी दुकाने बंद ठेवावे लागतील.

महत्वाची बाब म्हणजे मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग निर्णय घेईल, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे नव्या नियमानुसार २२ जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारी ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं सुरु ठेवता येतील. तर शनिवारी दुपारी ३ पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यास मुभा असेल. मात्र रविवारी पूर्णत: बंद असेल. सरकारच्या या नियमावलीमध्ये मुंबई लोकल रेल्वेचा कुठेही उल्लेख नाही.

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल ३ चे निर्बंध

महाराष्ट्रातील ११ जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या ११ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमावलीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :

१) सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉलसह रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी. शनिवारी मात्र मात्र दुकानं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार
२) सर्व ग्राऊंड, गार्डन्स हे व्यायामासाठी खुली ठेवण्यास मंजुरी
३) सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी. फक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
४) जी कार्यालयं वर्क फ्रॉम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी.
५) कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी
६) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येतील. वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी
७) जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे शनिवारी दुपारी ४ पर्यंत सुरु राहतील तर रविवारी पूर्णपणे बंद
८) मुंबईतली लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंदच, नव्या नियमावलीत लोकल सोडण्यावर कुठलेही भाष्य नाही.
९) मुंबई, उपनगर आणि ठाण्याचा निर्णय आपत्कालीन विभागच घेणार

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या ६ ते ७ हजारांच्या दरम्यान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी सहा ते सात हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यातील एखादी चूक देखील मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकते. राज्यात येत्या काळात एका दिवसात दहा हजार रुग्ण देखील आढळू शकतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अकरा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण किती?

पुणे (१५६८०), सातारा (८१५३), सांगली (७५४६), कोल्हापूर (५९७०), अहमदनगर (६६१०), सोलापूर (४९३६), रायगड (२८३०), रत्नागिरी (२२४९), सिंधुदुर्ग (१९८६), बीड (१८३१), पालघर (१११५) सक्रिय रुग्ण आहेत.

लेव्हल ३ चे नियम

१. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
२. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
३. मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
४. रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील.
५. उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
६. सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
७. खासगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
८. कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खासगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
९. क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं. ९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
१०. चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
११ . सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
१२. लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
१३. अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
१४. बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
१५. बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
१६. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील.
१७. ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
१८. जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
१९. व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतु, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
२०. सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
२१ . मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
२२. खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
२३. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
२४. उत्पादनाच्या अनुषंगाने :

अ. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
ब. सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
क. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
ड. अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button