‘पेगासस’ प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी : नितीश कुमार
नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेगासस फोन टॅपिंग मुद्यावरुन प्रचंड गदारोळ माजला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी याप्ररणी चौकशीची मागणी लावून धरली असताना आता, एनडीए सरकारमधील जनता दल यूनाइटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
नितीश कुमारांनी यापूर्वीही पेगासस प्ररणावर चिंता व्यक्त केली आहे. मीडियाशी संवाद साधताना याबाबत प्रश्न विचारला असता नितीश कुमार म्हणाले की, ‘याप्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. अनेक दिवसांपासून पेगासस फोन टॅपिंगवर गोंधळ सुरू आहे आहे. या मुद्यावर बोलायला हवं, चर्चा व्हायला हवी. ते पुढे म्हणाले की, आजकाल काही सांगता येत नाही. कुणीही कोणत्याही पद्धतीने फोन हॅक करू शकतं. या वर गांभीर्याने विचार करुन ठोस पाउलं उचलायला हवी.
काही दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खुलासा केला होता की, इस्रायलमधील पेगाससस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतासह जगातील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले. भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, पत्रकार एन. राम यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचं त्या रिपोर्टमधून सांगण्यात आलं. ती रिपोर्ट समोर आल्यापासून विरोधक सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.