पटोले म्हणतात सरकारचे संख्याबळ वाढणार, तर महाविकास आघाडीचे ५०-६० आमदार नाराज असल्याचा बावनकुळेंचा दावा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वादामुळे अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नाही. पण, आमच्याकडे १७४ आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे तसंच, जवळपास ५० ते ६० सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे बोलताना केला आहे. १६ महिने मुख्यमंत्री भेटत नसतील त्यांची कामे होत नसतील तर काय होणार, असंही बावनकुळे म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. विधान परिषदेत पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी या मुद्दावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. घटनात्मक अधिकार जे होते त्या अधिकारात त्यांनी राज्यपालांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांना जे अधिकार होते त्या अधिकारात त्यांनी एक राज्यपालांना पत्र दिले होते त्यानंतर राज्यपालांचे सहा वाजता पत्र न आल्याने आम्ही प्रक्रियेला सुरुवात केली. आज राज्यपालांनी सकाळी ही प्रक्रिया घटनाबाह्य आहे असे पत्र पाठवल्याने आम्हाला निवडणूक रद्द करावी लागली. आज सकाळी राज्यपालांचे पत्र आले त्याचा सन्मान केला गेला आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे, असं पटोले यांनी सांगितलं.
विषारी विचार राज्यात विरोधक पेरत आहेत त्यासाठी सोशल मीडियावर आता गांधीदूत असतील. काल कालिचरण महाराजाने महात्मा गांधी यांना शिव्या घातल्या. हिंदू लोक गांधींचा सन्मान करतात मात्र हिंदूत्ववादी लोक त्यांना अपमानित करतात, त्यामुळे राज्यात १० हजार गांधी दूत बनवणार आहे. तथाकथित कालिचरण महाराज यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पटोले यांनी केली.
महाविकास आघाडीचे ५० ते ६० आमदार नाराज : बावनकुळे
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नाही. पण, राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ? असा सवाल भाजपचे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. जवळपास ५० ते ६० सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
विधान परिषदेत निवडून गेल्यानंतर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी साई दरबारी हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ? मुळात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल चुकीचं पत्र सरकारला देणार नाही. या सरकारमध्ये खरच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असं आवाहन बावनकुळे यांनी सरकारला केलं.