बेलापूर किल्ल्याची दुरावस्था शिवभक्तांसाठी दुःखद; राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
नवी मुंबई : नवी मुंबई मुख्यालयासमोर असलेला ऐतिहासिक पेशवेकालीन बेलापूर किल्ल्याचा टेहळणी बुरुज पावसाची संततधार सुरु असल्याने ढासळला. या किल्लाचं ऐतिहासिक महत्त्व आहे. चिमाजी आप्पा यांनी या किल्ल्याचं नामकरण केलं होतं या किल्ल्यावरून वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवली जात होती. ही नवी मुंबईतील एकमेव अशी ऐतिहास साक्षीदार असलेली वास्तू होती जी पावसामुळे ढासळली. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. बेलापूर किल्ल्याची झालेली दुर्घटना ही शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद असून या प्रकाराला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
नवी मुंबईत दोन ते तीन दिवसांपासून पावसाची सतत बॅटिंग सुरू आहे. त्यात काही सखोल ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार समोर आले तर शुक्रवारी मध्यरात्री कोपरखैरणेमध्ये पाम सोसायटीत चार ते पाच गाड्यांवर झाडं पडल्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यात शनिवारी सततच्या पावसाने नवी मुंबई मनपा वास्तू समोरचा पेशवेकालीन बुरुज ढासळला. या किल्ल्याच्या बुरुजाची डागडुजी न केल्याने हा बुरुज ढासळल्याचा आरोप काही तरुण करत आहेत.
बेलापूर किल्ल्याची झालेली दुरावस्था ही शिवभक्तांसाठी अतिशय दुःखद असून या प्रकाराला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करून संबंधित अधिकारी निलंबित करा, अन्यथा राष्ट्रवादी युवक गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. किल्ल्याची डागडुजी व्यवस्थितरित्या केली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितीन चव्हाण यांनी केला आहे.
बेलापूरचा किल्ला ज्या खाडीकाठी उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहिले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.