वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात

लातूर : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे. याबाबत विचारलं असता चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिलंय. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंडगिरीवरुन धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय.
चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलिही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलिही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच बीड जिल्ह्यात जनता, व्यापारी, व्यावसायिक प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. वाळूमाफिया वाढले आहेत. अवैध दारु, मटक्याचे अड्डे वाढले आहेत. आम्ही रोज पोलिसांना बोलतोय. हे सर्व बीड जिल्ह्यासाठी हानीकारक आहे, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी केलाय.
धनंजय मुंडे यांचा पंकजांना टोला
मुंबई हायकोर्टाने अजूनही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का केला नाही? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना वाटली जाणारी चिक्की निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यात अत्यंत खळबळजनक माहिती उजेडात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने एका दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याचे समोर आले होते. या खरेदीसाठी एका दिवसात २४ आदेश काढल्याचाही आरोप झाला होता. या खरेदीत नियमभंग केल्याचाही आरोप झाला होता. याचं कारण ३ लाख रुपयांच्यावरची खरेदी ई-टेंडरद्वारे करण्याचा नियम आहे.
दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी या सर्व आरोपांना उत्तर दिले होते. शिवाय, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोणताही नियम धाब्यावर बसवलेला नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनीही पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती.