राजकारण

सहकारी सोसायट्यांच्याही निवडणुकीची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरु करण्याचे आदेश

मुंबई : सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या २० सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र, आता निवडणूक लांबवणे शक्य नसून त्या होतीलच असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. या भूमिकेनंतर प्राधिकरणाने निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांत घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा असं प्राधिकरणानं म्हटलंय. तसेच त्यासाठी प्राधिकरणाने एक स्वतंत्र पत्रक काढले आहे.

प्राधिकरणाने येत्या २० सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था सोडून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या तयार करुन सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या कोरोना महामारीचा प्रभाव असला तरी या निवडणुकांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button