मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य धादांत खोटे व दिशाभूल करणारे आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांना इतिहासाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करण्याची विकृती असून सावरकरांबाबत केलेले हे विधानही त्याच पद्धतीचे आहे. सावरकर यांनी राजनाथसिंह यांना स्वप्नात येऊन ब्रिटिशांना माफीनामा का दिला हे सांगितले होते का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी विनायक दामोदर सावकर आणि महात्मा गांधी यांच्या संबंधावर मोठं वक्तव्यं केलं आहे. अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. सिंह यांच्या या विधानानंतर देशभरातून गांधीवादी विचारक आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सिंह यांना सत्य जाणून घेण्याचं सूचवलं आहे.
राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, सावरकर व महात्मा गांधी यांचे वैचारिक मतभेद होते, दोघांच्या विचारात जमीन अस्मानचे अंतर आहे. सावरकर यांनी जेलमधून सुटका करुन घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडे अनेकवेळा माफीनामे सादर केले होते हे सर्वश्रुत आहे. सावरकरांची १९११ साली अंदमानच्या जेलमध्ये रवानगी केली होती, जेलमध्ये गेल्यानंतर सहा महिन्यातच सावरकर यांनी ब्रिटिशांना पहिला माफीनामा पाठवला होता. दुसरा माफिनामा १४ नोव्हेंबर १९१३ साली पाठवला त्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून ९ जानेवारी १९१५ रोजी भारतात आले. यावरून महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून माफीनामा सादर केला हे राजनाथसिंह यांचे विधान कपोलकल्पीत व हास्यापद वाटते. महात्मा गांधी यांच्याबद्दल रा. स्व. संघ व भाजपाचे विचार किती विकृत आहेत हे जगाला माहित आहे. राजनाथ सिंह यांनीही संघाच्या शिकवणीप्रमाणे असत्य विधान करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत परंतु संरक्षणाच्या संदर्भात ते फारसे कधी बोलल्याचे दिसत नाही. चीनने भारतीय सीमेत घुसखोरी करून आपली जमीन बळकावली आहे. सीमेवर पाकिस्तान दररोज कुरापाती करत आहे. आपल्या सैनिकांचा नाहक बळी जात आहे. परंतु संरक्षणमंत्री त्यावर कधी बोलले नाहीत. खोटी माहिती पसरवून समाजात संभ्रम निर्माण करण्यापेक्षा राजनाथसिंह यांनी देशाच्या सीमा संरक्षित राहतील व शत्रुराष्ट्राला भारताची दहशत वाटेल, चीन, पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेनेही पाहण्याची हिम्मत करणार नाही याकडे लक्ष द्यावे असेही लोंढे म्हणाले.
सावरकरांनी माफी मागितल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी गांधीजी भारतात आले : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करुन सावरकर आणि गांधी या वादात उडी घेतली आहे. ‘आपल्या माहितीसाठी सांगतो, सावरकरांनी पहिली माफी १९११ साली मागितली. तेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. माफी मागितल्यावर तब्बल चार वर्षांनी म्हणजे १९१५ साली गांधीजी भारतात परत आले,’ असा इतिहास आव्हाड यांनी सांगितला आहे.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंह यांच्या या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे. …तर हे लोक महात्मा गांधींऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील पत्रव्यवहाराचा पुरावाही ट्विटरवरुन दिला. तसेच, या दोन्ही नेत्यांच्या संवादातील कालावधीही त्यांनी दाखवून दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजनाथ सिंह यांची पाठराखण
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे वाद चुकीचे आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असून, पणजी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आताच्या घडीला सुरू असलेल्या वीर सावरकर यांच्या दया याचिकेच्या विधानांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या काळात अनेकांचे अर्ज तयार केले होते. पण स्वत: केला नाही. त्यांना जेव्हा आग्रह झाला आणि सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी अर्ज केला. हा इतिहासाचा भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांत जास्त काळ आणि सर्वांत अडचणीच्या काळात सेल्युलर जेलमध्ये होते. खरी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या लोकांनी भोगली. त्यापैकी सावरकर एक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.