Top Newsराजकारण

मराठी पाट्यांच्या निर्णयाचे श्रेय फक्त मनसेचेच : राज ठाकरे

मराठी भाषेवरुन पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारनं १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांच्या आणि आस्थापनाच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक आहे असा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रेय लाटणाऱ्या इतर पक्षांना टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणाले की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असं त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी भाषेवरुन संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, याची अंमलबजावणी नीट करा. यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेसोबतच इतर भाषा नामफलकांवर चालतील. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मनसेच्या संदीप देशपांडेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता मराठी पाट्यांच्या श्रेयवादावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे. १० पेक्षा कमी कामगार असले तरी आस्थापना, दुकानांना मराठीत नावे द्यायलाच हवीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे खळ्ळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना कुंभकर्णाची उपमा दिली आहे. रामायण वाचले असेल तर कुंभकर्ण बारा-बारा वर्षे झोपायचा, असे म्हणतात. हा सरकारचा जो कुंभकर्ण आहे, तो घरी १४ वर्षे झोपला होता. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, यामुळे मराठी पाट्यांचा निर्णय घेतला. आमची हरकत नाही, आम्ही त्याचे स्वागत करतो. या निर्णयाची अंलमबजावणी व्हायला हवी. १९६२ पासून कायदा होता, आता पुन्हा आलाय. अंमलबाजवणी नाही झाली तर मनसे खळ्ळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button