मुंबईत ‘ऑनलाईन मद्य विक्री’ला परवानगी

मुंबई : मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्येही मागील वर्षीप्रमाणे यावेळीही वाईनशॉप धारकांना ‘ऑनलाईन मद्य विक्री’ करण्यास परवानगी दिली आहे. संपूर्ण आठवडाभर ही घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. तसेच, बारमधूनही मद्य घरपोच मिळणार आहे. वाईनशॉपधारकांना त्यांच्या दुकानावर कोणत्याही ग्राहकाला ऑनलाईन ऑर्डरशिवाय मद्याची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कडक लॉकडाऊन असो अथवा कितीही कडक निर्बंध, तळीरामांची दररोजची ‘तहान’ भागणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सरकारी तिजोरीवर होणारा परिणाम लक्षात घेता या ऑनलाइन वाईन विक्रीमधून सरकारला सर्वात जास्त उत्पन्न मिळणे सुरू राहणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी याबाबतचे एक परीपत्रक जारी करुन ऑनलाईन वाईन विक्री व घरपोच मद्य पुरवठा करण्यास विशेष परवानगी दिली आहे. वाईनशॉप बंद ठेवल्याने तळीरामांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी व्यापारी बांधवांनी आंदोलन करून लॉकडाऊनला रस्त्यावर उतरून विरोध दर्शविला. मात्र, गुपचूप वाईन पिऊन स्वतःला व्हाइट कॉलर समजणारे व्यापाऱ्यांसारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाहीत. त्यांची ही अडचण सरकारने ओळखली आणि सरकारने स्वतःहून वाईनशॉप धारकांना ऑनलाईन मद्य विक्रीसाठी परवानगी दिली.
एका परवानगीमुळे आता तळीरामांची घरपोच सोय झाली. सरकारच्या तिजोरीत उत्पन्न जमा होणार असून वाईन शॉपधारकांची दुकानदारी सुरू राहून त्यांनाही स्वतःचे पोट भरता येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ही मद्य घरपोच देता येणार आहे. तसेच मद्य घरी पोहचवणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता आणि कोविड संबंधीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.