पटना : बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. लोजपाचे ५ खासदार अचानक फुटल्यानंतर आता काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात पुढील रणनीती अंतर्गत काँग्रेसमध्ये फूट पाडून एनडीए मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जेडीयू आणि भाजप दोघांनीही आपापल्या रणनीतीवर काम करण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेसचे अनेक नेते जेडीयूसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत. जर हे असेच घडले तर बिहारमध्ये लोजपानंतर आणखी एक मोठा पक्ष फुटण्याच्या स्थितीत असेल. काँग्रेसचे अनेक नेते जेडीयू नेत्यांचसोबत चर्चा करत आहेत. केवळ संख्याबळाची वाट पाहत आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी जेडीयूचे नेते अनेक मिशनवर काम करत आहेत. मागील आठवड्यात काही नेत्यांसोबत जेडीयू नेत्याची बैठक झाली. काँग्रेसकडे सध्या विधानसभेत १९ आमदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यात न अडकण्यासाठी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि आमदारांना पक्षात घेण्यासाठी १३ आमदारांची गरज आहे. हा आकडा जुळवण्यासाठी अडचण येत आहे. परंतु १३ आमदारांची साथ मिळताच जेडीयू काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.
अलीकडच्या दिवसात जीतन राम मांझी आणि मुकेश सहानी यांच्या विधानांमुळे एनडीएमध्ये वातावरण तापलं होतं. जीतन राम मांझी मागील काही दिवसांपासून समन्वयक समितीच्या बैठकीची मागणी करत भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत असल्याने एनडीएत खळबळ माजली आहे. मी नितीश कुमार यांच्यासोबत आहे असं जीतन राम मांझी म्हणत आहेत. तर दुसरीकडे मुकेश सहानी यांचे वक्तव्य आणि मांझी यांच्यासोबत भेटीनं एनडीएत सगळं काही ठीक आहे असं वाटत नाही. लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवशी मांझी तेजप्रताप यांच्या घरी पोहचले होते. तिथे त्यांनी लालू यांच्यासोबत फोनवरून १० मिनिटं संवाद साधला. त्यामुळे काँग्रेस फुटली तर सहकारी पक्षांवर अंकुश ठेवणं एनडीएला सोयीस्कर जाणार आहे.
लोकजनशक्ती पार्टीत उभी फूट
लोकजनशक्ती पार्टीच्या सहा पैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व बंडाळीचे नेतृत्व अन्य कुणी नाही तर रामविलास पासवान यांचे बंधू आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस हे करत आहेत. पशुपती पारस हे अलौली मतदारसंघातून पाचवेळी आमदार म्हणून निवडून आळे आहेत. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केल्यानंतर आता लोकजनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता. मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मात्र पशुपती पारस यांनी बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे.