
मेलबोर्न : सर्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी शेवटची संधीही जोकोविचने गमावली आहे. न्यायालयानाने त्याच्या याचिकेच्या विरोधात निर्णय दिला आहे. त्यामुळे जोकोविचला आता ऑस्ट्रेलियामध्ये राहता येणार नाही. जोकोविचला ऑस्ट्रेलियामधून हद्दपार केले जाणार आहे. फेडरल कोर्टाने लसीकरण न केलेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा सरकारी निर्णय कायम ठेवला. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलिया ओपनमधून बाहेर गेला आहे. इतकेच नाही तर जोकोविचवर आता ऑस्ट्रेलिया देशात येण्यास तीन वर्षांसाठी बंदीही घालण्यात आली आहे.
नोवाक जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. ज्यामुळं समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता. जोकोविचच्या वकिलानं सरकारच्या या निर्णयाला तर्कहीन म्हणत कोर्टामध्ये या विरूद्धात याचिका केली. जोकोविच हा सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र रविवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्याचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने त्याला माघारी परतावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच मेलबर्न वि्मानतळावर पोहोचला होता. त्यानंतर जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रं सादर न केल्यामुळं त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. जोकोविचला कोर्टाच्या सुनावणी आधी ताब्यातही घेण्यात आले होते.