Top Newsराजकारण

आ. नितेश राणे प्रकरण : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. महत्वाचे म्हणजे, नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. दरम्यान, नारायण राणे यांच्या कणकवली येथील घराच्या प्रवेश द्वारावर ही नोटीस चिकटवण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपचे आ. नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही.

यासंदर्भात, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असा प्रतिप्रश्नही नारायण राणे यांनी केला होता. याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात माहिती तर नाही ना, असाही होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या संदर्भात विचारणा करत ही नोटीस बजावली असल्याचे समजते.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा हात असल्याचा आरोप शिवसेना करत आहे. यासंदर्भात, एका पत्रकाराने नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न केला असता ते भडकले आणि म्हणाले, असा प्रश्न असतो? ते कुठे आहेत हे सांगायला काय मूर्ख माणूस समजलात का तुम्ही मला? कुठे आहेत काय आहेत, जरी मला माहीत असेल तरी मी सांगणार नाही. का सांगावं? तुम्हाला का सांगावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत.

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी राणेंना नोटीस बजावल्याने हे प्रकरण अजून चिघळले आहे.

दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली

भाजप आमदार नितेश राणे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावली आहे. नितेश राणेंना हजर करा किंवा स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहा, अशी सूचना या नोटिशीत देण्यात आली आहे. मात्र, नोटीस लावून दहा मिनिटं होत नाही तोच राणेंच्या कर्मचाऱ्यांनी ही नोटीस काढून टाकली. त्यामुळे आता राणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पोलिसांची नोटीस जशीच्या तशी

प्रति,

सी.आर.पी.सी कलम १६० (१) अन्वये नोटीस

श्री. नारायण तातु राणे, (केंद्रीय मंत्री, भारत सरकार) रा. ओम गणेश बंगला, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांना

विषय:- गुन्ह्याचे तपासकामी कणकवली पोलीस ठाणे येथे हजर राहणेबाबत.

संदर्भ :- कणकवली पोलीस स्टेशन, जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजि, क्रमांक ३८७/२०२१ IPC कलम ३०७, १२० (ब), ३४ प्रमाणे.

आपणास या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.३८७/२०२१ भा.द.वि.कलम ३०७,१२० (ब), ३४ या गुन्ह्यात श्री. नितेश नारायण राणे हे पाहीजे आरोपी असून त्यांचा ठावठिकाणा अथक प्रयत्न करुन सुद्धा मिळुन येत नाही व सदर आरोपीचा शोध जारी आहे.

आपण काल दि. २८.१२.२०२१ रोजी पत्रकार परीषद घेतली होती. सदर गुन्हयाबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच एका पत्रकाराने आपणास पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यांच्या ठाव ठिकाणाबद्दल प्रश्न विचारला असता आपण श्री. नितेश राणे हे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे विधान केले. तसेच सदरील बाबतीत आज दि.२९.१२.२०२१ रोजी रत्नागिरी टाईम्स आणी इतर वृत्तपत्रातुन आपले सदर विधान प्रसिद्ध झाले आहे.

वरील सर्व बाबींचा सर्वकष विचार करता असे दिसते की, श्री. नितेश राणे या आरोपीचा ठाव ठिकाणा आपणास पुर्णपणे माहीती आहे.

तरी सदरील नोटीस मिळताच आपण पाहीजे आरोपी श्री. नितेश राणे यास आमचे समोर हजर करावे. तसेच आपल्या पत्रकार परीषदेनुसार आपल्याला माहीती असलेल्या गुन्हयाच्या तपशिलाबाबत जबाब नोंदविण्यासाठी दि. २९.१२.२०२१ रोजी १५.०० वाजता कणकवली पोलीस ठाणे येथे आमचे समोर स्वतः हजर रहावे.

● निरीक्षक पोलीस कणकवली

(सचिन ए. हुंदळेकर) पोलीस निरीक्षक कणकवली पोलीस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button