पंतप्रधानांच्या भेटीतून काहीही निष्पन्न होणार नाही : विनायक मेटे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या भेटीमागे मुख्यमंत्री राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीतून काहीही निष्पन्न होणार नाही. मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
या भेटीमागे स्पष्टपणाने राजकारण जास्त आणि मराठा समाजाचे विषय कमी असं स्पष्टपणे दिसून येत आहे. जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, फेरविचार याचिका दाखल करा तेच आता भोसले समितीने सांगितले आहे. ते न करता अर्ज करण्यासाठी विनंती करायला गेले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया सुरु करायला हवी परंतु हे न करता राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना भेट घ्यायला गेले आहेत. कोणत्याही गोष्टी कायदेशीरपणाने योग्यरित्या न करता ही भेट आहे. फक्त मराठा समजाला झुलवत ठेवून आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखव्याचा प्रकार आहे. तसेच स्वतःची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणे एवढाच या भेटीच्या मागे खरा उद्देश दिसतो आहे. आपल्या हातातले निर्णय न घेता दुसऱ्यावर ढकलण्याच्या दृष्टीने ही भेट सुरु आहे. या भेटीने काहीही साध्य होणार नाही आहे. असे मोठे विधान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले आहे.