Top Newsराजकारण

देशात १०० कोटी नव्हे, तर केवळ २३ कोटी लसी दिल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू !

संजय राऊतांचे मोदी सरकारला आव्हान

नाशिक : देशात कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या मोहिमेत नुकताच लसीचे १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये देशाने मिळवलेले हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. मात्र या १०० कोटी लसीकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

एकीकडे लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसले आहे. तर काश्मीरमध्ये हत्याकांड होत आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जातात, अशी टीकाही राऊत यांनी केली. देशातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी काही बोलत नाही, असेही ते म्हणाले.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत आम्ही येथे शिवसेनेची सत्ता आणू. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा आकडा हा १०० आमदारांच्या पुढे गेला पाहिजे. नाशिक शहरामध्ये सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही याचीही खंत आपल्याला वाटली पाहिजे, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील भाजपाचे सरकार घालवले. आता दिल्लीकडे कूच करायची आहे. मात्र देशात महाविकास आघाडी म्हणनू नाही तर शिवसेना म्हणून जाणार आहोत. राज्यातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची झोप उडाली आहे. मात्र त्यांना सत्तेबाहेर काढल्यापासून आम्हाला शांत झोप लागते, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

आज आपण दादरा नगर हवेली येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहोत. तिथे आपला उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. त्यानंतर गुजरात आणि इतर राज्यातील निवडणुकाही आम्ही लढवणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडे देशाचं नेतृत्व द्यायचं असेल तर शिवसेनेचे आमदार, खासदार वाढले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

चिखलफेक थांबवायची असेल तर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या

नाशिकमधून बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याचं आवाहन केलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button