राजकारण

कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत; ठाकरे सरकारमधील घटक पक्षाची नाराजी

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत इतर छोटे पक्षही सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा विसंवाद दिसून येतो. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार मांडत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीही सावध भूमिका घेत आहेत. राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारा समाजवादी पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

त्याचसोबत भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. याबाबतही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक होणार असेल तेव्हा आमची आठवण होईल. आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button