मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ५० टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती . त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत होते. मात्र यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यात आता दसरा मेळावा आहे. यावेळी रामदास कदम यांना बोलावलं नसेल अशी देखील चर्चा सुरू आहे.
रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशाप्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ॲाडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे. त्यामुळे या दसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना एन्ट्री नसेल असही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या कथित ऑडिओ क्लिपमुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. इतकंच नाही तर रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करुन रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतं. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
नुकतीच रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्याआधी कोकणातील अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत दुफळी निर्माण केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांवर सध्या शिवसेनेत नाराजी आहे. बाळासाहेबांच्या काळातले हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडचण निर्माण करत आहेत? एवढी मंत्री पदे मिळूनही माजी मंत्री पक्षाला बदनाम का करत आहेत? असा सवाल आता काही शिवसैनिक विचारू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी व आताच्या शिवसेना नेत्यांची या बदनाम करणाऱ्या नेत्यांना मेळाव्याला बोलावू नका अशी भूमिका आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला रामदास कदम व अनंत गीते यांना यांना एन्ट्री मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.