गोवा निवडणूक : पक्षांतर, भ्रष्टाचार करणार नाही ! ‘आप’च्या सर्व ३९ उमेदवारांनी घेतली शपथ

पणजी : निवडून आल्यास पक्ष सोडणार नाही तसेच भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ आम आदमी पक्षाच्या सर्व ३९ उमेदवारांनी बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत घेतली.
याप्रसंगी पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले की, गोव्याच्या राजकारणाला लागलेली भ्रष्टाचार आणि पक्षांतराची कीड दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिक आणि मेहनती उमेदवार निवडले आहेत. आमचे सर्व उमेदवार भ्रष्टाचार आणि पक्षांतराविरोधातील प्रतिज्ञेवर सह्या करतील. प्रतिज्ञापत्राच्या प्रती घरोघरी मतदारांना दिल्या जातील. जेणेकरून एखाद्या उमेदवाराने निवडून आल्यानंतर स्वार्थासाठी पक्षांतर केल्यास मतदारच त्याच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करू शकतील.
केजरीवाल म्हणाले की, आपापल्या मतदारसंघांमध्ये आमचे उमेदवार प्रामाणिकपणे लोकांची सेवा बजावतील. जनतेचा विश्वासघात करणार नाहीत. सर्व ३९ उमेदवारांनी शपथ घेताना असे म्हटले आहे की, ईश्वराला साक्षी ठेवून आम्ही अशी शपथ घेतो की, माझ्या मतदारसंघात लोकांनी मला निवडून दिल्यास मी कधीच कोणाकडूनही लाच घेणार नाही. आम आदमी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मतदारांची नेहमीच सेवा करणार. मी जर दिलेला शब्द पाळला नाही, तर मतदार कोर्टात जाऊन माझ्यावर कारवाई करू शकता. कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वखुशीने मी ही प्रतिज्ञा करीत असल्याचे म्हटले आहे. डिचोली मतदारसंघात आपने उमेदवार दिलेला नसून अन्य उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे.
निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री जाहीर करणार; गोवा काँग्रेसचे स्पष्टीकरण
२०१७ साली मुख्यमंत्री कोण या शर्यतीत अडकून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यास विलंब केलेल्या काँग्रेसला आता शहाणपणा आलेला आहे. निकाल लागताच पाच मिनिटांत मुख्यमंत्री कोण ते जाहीर करु आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी दहा मिनिटांत राजभवनवर पोहोचू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागांवर विजय मिळाला. भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापनेसाठी दावा करु शकला नाही. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत मतैक्य होत नव्हते. दिगंबर कामत, लुइझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंह राणे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. दिग्विजय सिंह हे तेव्हा काँग्रेसचे गोवा प्रभारी होते.
काँग्रेसला १७ जागा मिळाल्यानंतर अपक्ष रोहन खंवटे, प्रसाद गावकर यांनी पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. गोवा फॉरवर्ड व मगोपचे प्रत्येकी तीन आमदारही काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी अनुकूल होते. परंतु काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरेना आणि सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनवर पत्र पाठवण्यास काँग्रेसने विलंब केला. हीच संधी साधून भाजपने दिवंगत मनोहर पर्रिकर यांना केंद्रातून गोव्यात पाठवले आणि फॉरवर्ड व मगोप तसेच अपक्षाचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापन केले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस या वेळी दक्ष आहे.
राष्ट्रवादीची २४ स्टार प्रचारकांची यादी जाहीर
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींचा समावेश आहे.