
ठाणे : ठिणगी लावली तर आग भडकणारच. घरी बसलेल्या नेत्याला बोलण्याची संधी मिळावी, त्यासाठी हे सर्व सुरु आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक अशीच सुरु राहिली तर पालकमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. पण वैयक्तिकरित्या अशी महाविकास आघाडी नको अशी भूमिका ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मांडली.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी महापौरांवर केलेल्या टीकेनंतर म्हस्के यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे आणि योगेंद्र जानकर यांनीही तत्काळ पत्रकार परिषद घेऊन परांजपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडी असल्यामुळे कोणतेही राजकीय भाषण किवा टीकाटीप्पणी नको, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्यांचे आदेश शिवसैनिक पाळतात. परंतू, आव्हाड यांनी मात्र टीकाटीप्पणी केली. तो विषय संपला. दिशा बदलूनही आपली हालत काय झाली? हे ज्यांना समजले नाही, त्यांनी महापौरांना कळले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कलियुगातील कलींना पुरुन उरण्यासाठी या नारदाची गरज असल्याचेही महापौर म्हणाले.
शिवसेनेत नसतो तर महापौर झालो नसतो. त्यामुळे पक्षासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्मार्ट सिटीमध्ये आपल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेही संचालक आहेत. ही कंपनी कायद्याप्रमाणे चालते. याच्या कामकाजाची माहिती करुन घ्यावी, मगच कमिशनचा आरोप करावा, असेही महापौर म्हणाले. तर शिवसैनिकांनी चपला झिजवल्यामुळेच दिवंगत प्रकाश परांजपे यांच्यानंतर आनंद हे खासदार झाले होते, अशी आठवण जानकर यांनी करुन दिली. आघाडीतील खऱ्या अर्थाने नारमुनी हे आनंद परांजपे असल्याचे विकास रेपाळे म्हणाले.
मुंब्रा येथील वाईट कामाचा दोष राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शानू पठाण महापौरांना देतात. मग चांगल्या कामाचे श्रेय देखील द्यायला हरकत नाही. निधी पाहिजे असल्यास नारदमुनी चालतो का? असा सवालही महापौरांनी उपस्थित केला. मिशन कळवा जर राष्ट्रवादीला झोंबले असेल तर आघाडी होईल नाही होईल. यापुढे मिशन मुंब्रा, वागळेच नव्हे तर बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेना मिशन ठाणे महापालिका राबविणार असल्याचा दावाही त्यांनी केला. चिखल उडवून घ्यायचा नसून आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचेही त्यांनी जाहीर केले.
चप्पल आल्यामुळे बापाची अक्कल येत नाही, आनंद परांजपेंचा खा. श्रीकांत शिंदेंना टोला
खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयाची लढाई रविवारीही पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, असा टोला परांजपे यांनी लगावला. त्यानंतर आपण ठिणगी लावली तर आग लागणारच, आम्ही शिवसैनिक आहोत, असा प्रतिटोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी परांजपेंना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर आधी मंत्री आव्हाड आणि नंतर कल्याणचे खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पालकमंत्र्याचे आदेश धुडकवले आहेत.
आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल, मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा असल्याचा पुनरुच्चार केला. खासदार शिंदे यांनी श्रेय घ्यावे मात्र, गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादीवर आघात झाला तर आपण प्रतिउत्तर देणारच असेही स्पष्ट केले.
आव्हाड यांनी महापौरांना दिलेली नारदमुनींची उपमा ही योग्य होती. महापौर हे कलियुगातील नारदमुनी असून त्यांना दिलेली उपमा योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. मग दिवा उड्डाणपूल कधी होणार?उड्डाणपुलाच्या पाठपुराव्याबरोबर मतदारसंघात विकास कामे झाल्याचा दावा केला. ती यापूर्वीही होत होती. जर विकास झाला असेल तर कल्याण टर्मिनन्स, शीळलफाटा, मानकोली मोठा गाव ब्रिज, दिवा उड्डाणपूल कधी होणार, याची टाइम लाईनदेखील खासदारांनी द्यावी, असे आव्हानही परांजपे यांनी दिले.




