मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती नाही : आशिष शेलार
सांगली : महाविकास आघाडीतील काही पक्ष येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत असताना भारतीय जनता पक्षानं ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तसे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झेंडाचा रंग बदलत प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानं मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल शेलार यांना विचारलं असता मनसेसोबत युती करणार नसल्याचं उत्तर शेलार यांनी दिलं. त्यामुळे मुंबईत भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आशिष शेलारांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. शिवसेना आघाडीत गेल्याने मुंबई महापालिका निवडणूक तुम्ही मनसेला सोबत घेऊन लढणार का? असा सवाल शेलारांना करण्यात आला. त्याला शेलार यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं. नाना पटोले दरवेळी विनोदी विधानं करतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. त्यांचा कोडवर्ड अमजद खान ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता विदर्भात गेले आहेत वाटतं. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा सवाल शेलार यांनी केला.