पटना : बिहार निव़डणूक संपताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. तसे करणे त्यांना भागही होते. परंतु सात महिन्यांतच नितीशकुमारांनी पुन्हा दुसऱ्या वारदाराची निवड केली आहे. आज झालेल्या जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार ललन सिंह यांना नवा राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले आहे.
ललन सिंह हे नितीश कुमार यांचे विश्वासू साथीदार आहेत. ते आरसीपी सिंह यांची जागा घेणार आहे. नितीश कुमार यांनी डिसेंबर २०२० च्या अखेरीस आरसीपी सिंह यांना पक्षाचा अध्यक्ष केले होते. आजची ही बैठक दिल्लीच्या जेडीयू कार्यालयात सुरु असून नितीश कुमारदेखील या बैठकीला उपस्थित होते.
नितीशकुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळीदेखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीशकुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. आता त्यांच्यासमोर उत्तराधिकारी शोधण्याचे आव्हान होते. कारण सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीशकुमारांना विरोधकांसह भाजप, स्वपक्षियांकडूनही विचारणा होणार होती. म्हणून त्यांनी आरसीपी सिंह यांची निवड केली होती. परंतू पुन्हा अध्यक्ष बदलण्यात आला आहे.
नितीश २०२२ पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय़ अध्यक्ष राहू शकत होते. मात्र, त्यांनी मध्येच असा निर्णय का घेतला हे न समजण्यापलिकडचे आहे. या निर्णयामागे भाजपाचे वाढलेले वर्चस्वही बोलले जात आहे. नितीशकुमार मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष असल्याने जर त्यांनी भाजपाबाबत काही कठोर निर्णय घेतला तर आघाडी धर्माच्या मर्यांदांवरून प्रश्न उपस्थित झाले असते. यामुळे नितीश यांनी आरपीसी सिंह यांना अध्यक्ष करण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला होता.