महाराष्ट्रातील रस्त्यांची पुनर्बांधणी, विस्तारीकरणासाठी २ हजार ७८० कोटींचा निधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केलीय. राज्यातील रस्त्याचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी गडकरींनी या निधीची घोषणा केली आहे. रत्यांची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणासाठी 2 हजार 780 कोटी रुपयांचा निधी गडकरींनी महाराष्ट्रासाठी देऊ केला आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन देशातील विविध महामार्गांच्या कामांची घोषणा केली. #PragatiKaHighway या हॅशटॅगखाली गडकरी यांनी राष्ट्रीय आणि राज्यमार्गांच्या कामाबाबत घोषणा केल्या आहेत.
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 F – परळी ते गंगाखेड, या महामार्गासाठी 224.44 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 – आमगाव ते गोंदिया, महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 239.24 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 – नांदेड जिल्ह्यात येसगी गावाजवळ मांजरा नदीवरील पूलाच्या कामासाठी 188.69 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 – वाडी/एमआयडीसी जंक्शन 4 पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी आणि नागपुरात आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत उड्डाणपुलाच्या कामासाठी 478.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 – 28.2 किलोमीटरच्या रस्त्यासह तिरोरा – गोंदिया राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 288.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 G – तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्ग विस्तारीकरणासाठी 167 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 – तिरोरा-गोंदिया भागात दोन पदरी मार्गासाठी 288 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 I – वाटूर ते चारठाण परिसरात दोन लेनच्या विस्तारीकरण आणि पुनर्बांधणीच्या कामासाठी 228 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 C – गडचिरोली जिल्ह्यात 262 किलोमीटर ते 321 किलोमीटरचे विस्तारीकरण आणि 16 लहान मोठ्या पुलांच्या बांधकामांसाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 E – गुहागर – चिपळूण मार्गावर विस्तारीकरणासाठी 171 कोटी रुपयांचा निधी मंजूर
– राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 J – जळगाव – भद्रावन – चाळीसगाव – नांदगाव – मनमाड या रस्त्याच्या चार पदरी विस्तारीकरणाच्या कामासाठी 252 कोटी रुपयांचा निधी मंजूर