आ. नितेश राणेंचा कोठडीत मुक्काम वाढला; आता सोमवारी सुनावणी

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्लाप्रकरणात ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्या अजूनही सुरू आहेत. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती मात्र सरकारी वकिलांनी प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे असा अर्ज केल्याने आजही नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होवू शकली नाही. यावर सरकीर पक्ष वेळ काढूपणा करतोय, असा आक्षेप नितेश राणे यांच्या वकिलांनी नोंदवला. मात्र, सुनावणी सोमवारीच होणार असल्याने नितेश राणे यांना पुढील काही दिवस तरी न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार आहे.
कणकवली येथील संतोष परब हल्ला प्रकरण आमदार नितेश राणे यांना चांगलेच भोवताना दिसत आहे. या प्रकरणी २ दिवसांची कणकवली पोलिसांची कोठडी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने सुनावली त्यानंतर ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत कालची रात्र सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात काढली.
छातीत दुखत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरु झाली. तसंच मुंबईत पाठवलेले वैद्यकीय अहवाल येणे बाकी असून आजची रात्र देखील नितेश राणे जिल्हा रुग्णालयात काढतील असंच दिसतंय. दुसरीकडे नितेश राणे यांना जामीन मिळाला याकरता त्यांचे वकील सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात गेले खरे मात्र तपास अधिकारी उपस्थित राहिले नाहीत आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे असा अर्ज केल्याने नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाली.
‘नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर दुसऱ्या कोर्टात सुनावणी करावी असा मी अर्ज केला. जिल्हा न्यायालयाला मेलद्वारे मी हा अर्ज केला. बी.आर. रोटे यांच्या न्यायालयातून दुसऱ्या कोर्टात सुनावणी घ्यावी, मी कोर्ट पोलीस मुल्ला यांना या विनंती अर्जावर तपास अधिकाऱ्यांची सही घ्यायला सांगितले होते. माझ्या आईचे आज तेरावे आहे त्यामुळे मी या परिस्थितीत युक्तीवाद करू शकत नाही, असा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला.
सरकारी वकिलांनी दिलेल्या पत्रावर कोणाची सही नाही, तपास अधिकाऱ्यांची सही घ्या असं सांगितले होते पण, तपास अधिकारी सही करण्याकरता आलेच नाहीत, असं कोर्ट पोलीस एस. बी. मुल्ला यांनी स्पष्ट केलं.
सरकारी वकिलांची बदमाशी : सतीश माने-शिंदे
सरकारी वकील मुद्दाम वेळ काढत आहे. सरकारी वकील बदमाशी करत आहेत. सरकारी वकिलांनी केलेला अर्ज बेकायदेशीर आहे. सरकारी वकिलांनी अर्ज मागे घेतला तरी जामीन अर्जावर सुनावणी घेतली पाहिजे. सरकारी वकील वारंवार तेच तेच मुद्दे उपस्थित करुन वेळ काढताय, असा आरोप सतीश माने-शिंदे यांनी केला.
तसंच, आताच युक्तीवाद झाला पाहिजे. सरकारी पक्ष आणि आम्ही युक्तीवाद करतो. न्यायालयाने मेरीटवर निर्णय द्यावा. तपास अधिकाऱ्यांची सही न घेताच इमेल कशा काय केला? असा सवाल संग्राम देसाई यांनी केला.
सरकारी वकिलांनी केलेल्या प्रकरण वर्ग करण्याच्या अर्जावर दोन्ही पक्षात जोरदार वाद झाल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सरकारी वकील प्रदीप घरत यांचा विनंती अर्ज दाखल करुन न घेता सुधारीत अर्ज सोमवारी करण्याचे आदेश दिले. यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नितेश राणे यांच्या वकिलांनी तत्काळ न्यायाधीश आर.बी. रोटे यांच्या कोर्टात धाव घेतली, पण कोर्टाच्या कामकाजी वेळ संपल्याने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल, असे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे नितेश राणे यांना पुढील काही दिवस तरी न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार कारण जामिन अर्जावर सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली असली तरी ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जास्तीत जास्त काळ न्यायालयीन कोठडीत काढावी लागतील असंच दिसतं.




