Top Newsराजकारण

आ. नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला; पुन्हा धावाधाव सुरू, हायकोर्टात अर्ज

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आ. नितेश राणे यांना पुन्हा एकदा झटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटकेपासून दहा दिवस संरक्षण देण्यात आलं आहे. अशास्थितीत सिंधुदुर्ग पोलिसांकडून नितेश राणे यांची गाडी अडवण्याचा प्रकार समोर आला. तेव्हा माजी खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. मला कायदा शिकवू नका, अशा शब्दात निलेश राणे यांनी पोलिसांना सुनावलं.

शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. सत्र न्यायालयातून सुटल्यानंतर नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. पण, सत्र न्यायालयाने दोन दिवस युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राणेंच्या अटकेची शक्यता होती. पण, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनाकरता केला आहे. जामीन अर्जाची प्रत मिळताच पुन्हा जामीन अर्ज केला आहे.

खरंतर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. ते आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टाबाहेर पडले आणि गाडीत बसले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांचा मोठा ताफा आजूबाजूला जमा झालेला बघायला मिळाला. पोलीस नितेश राणे यांना आता अटक करतील, अशी शक्यता असताना नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे धावून आले. त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, असं निलेश राणे ठामपणे म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर तीच भूमिका मांडली. त्यामुळे अखेर पोलिसांनी नितेश राणे यांच्या गाडीला जाऊ दिलं.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. नितेश राणे यांच्या अटकेबाबत पोलीस योग्य तो निर्णय घेतील. पोलीस परत एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि आज आलेल्या ऑर्डरचा विचार करतील. त्याप्रमाणे जे सार निघेल, त्यांना सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली मुदत संपली आहे, असं वाटलं तर अटक होईल. अटक करायची का? याबाबत पोलीस निर्णय घेतील. त्याबाबत मी बोलू शकत नाही. त्यांना कधी, कुठे अटक करायची ते पोलीस ठरवतील. आता अर्ज नामंजूर झाला म्हणजे अटकच करा, असं आम्ही म्हणणार नाही. आमच्या म्हणण्याबाबत ते तसंही कोर्टाच्या कस्टडीत गेलेले आहेत. आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या कस्टडीत ते मोकळे फिरत आहे. आम्हाला आता कोर्टाचा जो अहवाल येईल तो अयोग्य वाटला तर आम्ही त्याला आव्हान देऊ, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

नितेश राणेंनी दरदिवस विविध ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावं : खा. विनायक राऊत

दरम्यान, नितेश राणेंनी दरदिवस विविध ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

विनायक राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पोलिसांसोबत हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरं झालं असतं. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरून जे करण्याचं काम पोलिसांचं आहे. ते पोलीस करणारच आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी सुद्धा दरदिवस विविध ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान न करता त्यांनी पोलिसांना शरण जावं आणि कायद्याच्या अनुशंगाने जे काही होईल ते भोगावं, असं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण प्रकरणावर आता भाजप आणि शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत.

भातखळकरांचा सरकारवर निशाणा

हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळत नसेल तर यांचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्राच्या इतिहासातील सूडबुद्धीने वागणारं हे एकमेव सरकार आहे. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता हा सरकारचं लक्ष भाजप नेत्यांना अडचणीत कसं आणायचं आणि टक्केवारीची वसुली कशी करायची याकडे आहे. देशात कायद्याचं राज्य आहे. पण इकडे उद्धव ठाकरे यांना वाटतं की त्यांचं राज्य आहे, अशी खोचक टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

प्रसाद लाड यांचा सरकारला इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करत नितेश राणे यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. याबाबत आम्ही कोर्टात जाणार असल्याचा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलाय. सरकार दबावतंत्र वापरुन फक्त नितेश राणे यांच्यावर कारवाई करत आहे. यापूर्वीही मोठ्या राणे साहेबांवर कशाप्रकारे दबाव तयार करुन कारवाई केली हे आपण पाहिलं. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरही भाजपनं सत्ता कायम राखली हे शिवसेनेला पाहावत नाही. त्यामुळे बिथरलेल्या शिवसेनेकडून भीतीपोटी सरकारी यंत्रणेवर दबाव टाकण्याचं काम सुरु असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय.

उदय सामंत यांचं विरोधकांना उत्तर

शिवसेना म्हणून आम्ही या प्रकरणाकडे पाहत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत मंत्री म्हणून बोलणं योग्य नाही. पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर जे काही करायचं ते संबंधित यंत्रणा करेल. पोलीस काय करणार यात पालकमंत्री म्हणून आपण हस्तक्षेप करणार नाही. निकालात काय आदेश आहेत, त्यानुसार संबंधित यंत्रणा कारवाई करतील. कायदा आणि सुव्यवस्था बिघणार नाही याची पूर्ण जबाबदारी पोलिस विभागाची राहणार आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करतील, असंही उदय सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button