नीरव मोदीला भारतात आणणार
नवी दिल्लीः पंजाब नॅशनल बँकेला 14,000 कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेल्या नीरव मोदीला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. लंडनच्या न्यायालयानं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी मंजुरी दिलीय. भारतात प्रत्यार्पणासाठीच्या याचिकेवरील लंडनच्या वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. लंडनच्या न्यायालयाने आपला निकाल सुनावताना प्रत्यापर्णाला मंजुरी दिली. नीरव मोदीनं आतापर्यंत पीएनबीला कोट्यवधींचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे नीरव मोदींची देशात आणि परदेशातही कोट्यवधींची मालमत्ता आहे.
गेल्या काही वर्षांपासून ईडी नीरव मोदीच्या मार्गावर आहे. नीरव मोदी खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने साक्षीदार म्हणून पूर्वी मोदी आणि मयंक मेहता पुढे आले होते. पूर्वी मोदी आणि मयंक मेहता यांच्या सहकार्यामुळे सक्तवसुली संचनालयाला (ईडी) नीरव मोदीची संपत्ती जप्त करता आली, असे ईडीने न्यायालयात म्हटलं होतं.
दिवंगत केंद्रीय माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्या भेटीवरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून काँग्रेसनंही भाजपवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतर काँग्रेसचे माजी नेते शहजाद पुनावाला यांनी एक वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले होते.
2013 मध्ये राहुल गांधी एका पार्टीत नीरव मोदीला भेटले होते. याच काळात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना बँकेकडून कर्ज देण्यात आले होते, असा दावा शहजाद पुनावाला यांनी करून खळबळ उडवून दिली होती. सप्टेंबर 2013 मध्ये नीरव मोदी आणि राहुल गांधी यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीच्या वेळी मी तिथे हजर होतो. याच काळात बँकांनी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले होते. मी लाय डिटेक्टर टेस्ट करायलाही तयार आहे, असे पुनावाला म्हणाले होते.
नीरव मोदीची संपत्ती 579 कोटींची जप्त केली
‘ईडी’ने पूर्वी मोदी आणि मयंक मेहता याच्या मदतीने नीरव मोदीची संपत्ती 579 कोटींची जप्त केली होती. त्यात न्यूयॉर्कमधील दोन फ्लॅट, लंडन आणि मुंबईतील एक एक फ्लॅट, स्विस बँकेची दोन खाती आणि मुंबईतील एक बँक खात्याचा समावेश आहे. नीरव मोदीची यापूर्वी 329.66 कोटींची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली होती. त्यात मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. अलिबागमधील फार्मा हाऊसवरदेखील ईडीने टाच आणली आहे.