
रत्नागिरी : शिवसेने खा. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. २०२४ नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे.
नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात बांधली नाही. त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. २०२४ नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, याची खात्री आम्ही ही घेतली आहे. लोकही घेतील, असा पलटवार निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे. .
विनायक राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नाही. मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करेल. राणेंचा पुढच्या जन्मावर विश्वास नाही. आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताच आता शिवसेनेला संपवेल, याची खात्री आहे. कारण यांना करायचं काहीच नाही. बोलाचा भात आणि बोलाचीच कढी अशी यांची अवस्था आहे. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रा कशासाठी आहे, हे विनायक राऊत यांना समजणार नाही, असा टोलादेखील निलेश राणे यांनी लगावला.