मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार ‘एनआयए’च्या ताब्यात
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणात एक नवा खुलासा आता समोर येण्याची शक्यता आहे. कारण मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार एनआयएनं जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीची पाहणी एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. एनआयएचे सात ते आठ अधिकारी या मर्सिडीज कारच्या डिक्कीची पाहणी करत आहे. त्यामुळे या कारच्या डिक्कीत काय गूढ दडलंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात इनोव्हा कारची माहिती मिळाल्यानंतर एनआयए एका मर्सिडिज कारच्या शोधात होती. त्यानंतर संबंधित मर्सिडीज आज एनआयएकडून जप्त करण्यात आली. या कारच्या डिक्कीची पाहणी सुरु आहे. या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात या मर्सिडिज कारची भूमिका स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ इतकीच महत्वाची असल्याचं बोललं जात आहे.
NIAच्या हाती एका मर्सिडिज कारचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं होतं. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचं असल्याचं सांगण्यात येत आहे. याच मर्सिडिजमध्येच मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला होता. NIAला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनसुख हिरेन कुणाची तरी वाट पाहत होते असं दिसतंय. काही वेळाने त्यांच्याजवळ ही मर्सिडिज कार येते. हिरेन त्या गाडीत बसून निघून जात असल्याचं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. NIAच्या हाती लागलेलं हे सीसीटीव्ही फुटेज मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या काळातलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
महत्वाची बाब म्हणजे ही मर्सिडीज कार स्वत: सचिन वाझेच वापरत असल्याची माहिती समोर येत आहे. या कारला अनेकदा बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या मर्सिडीज कारच्या डिक्कीतून एनआयएच्या हाती नेमके कोणते पुरावे लागतात हे महत्वाचं ठरणार आहे. मनसुख हिरेन यांनी या गाडीतून शेवटचा प्रवास केला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या डिक्कीत काय दडलं होतं? ती गाडी कुणी हाताळली होती? याचा शोध फॉरेन्सिक टीम घेण्याची शक्यता आहे.