मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताचे वर्चस्व आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे. पहिल्या डावात भारताने ३२५ धावांपर्यत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ ६२ धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला ५४० धावांचं लक्ष्य दिलं. ५४० धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १४० धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात ४०० धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे.
भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कप्तान टॉम लॅथमला (६) स्वस्तात बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर अश्विनने विल यंग (२०) आणि रॉस टेलर (६) यांनाही तंबूत मार्ग दाखवत न्यूझीलंडची अवस्था खिळखिळी केली. ३ बाद ५५ अशी धावसंख्या असताना डॅरिल मिशेलने किल्ला लढवला. त्याला हेन्री निकोल्सची साथ लाभली. या दोघांनी संघाचे शतक पूर्ण केले. विराटने अक्षर पटेलला चेंडू सोपवला आणि अक्षरने मिशेलला जयंत यादवकरवी झेलबाद करत ही भागीदारी मोडली. मिशेलने ७ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. मिशेलनंतर आलेला यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल खातेही न उघडता धावबाद झाला. १२९ धावांत न्यूझीलंडने ५ फलंदाज गमावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने ५ बाद १४० धावा केल्या. रचिन रवींद्र २ तर निकोल्स ३६ धावांवर नाबाद आहे.
भारताचा दुसरा डाव
क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्यामुळे शुबमन गिलऐवजी चेतेश्वर पुजाराने मयंक अग्रवालसोबत सलामी दिली. या दोघांनी चांगली सलामी देत संघाचे शतक फलकावर लावले. पहिल्या डावात शतक ठोकलेल्या मयंकने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकले, तर चेतेश्वर पुजारा त्याच्या अर्धशतकाच्या जवळ पोहोचला. पहिल्या गड्यासाठी १०७ धावा उभारल्यानंतर फिरकीपटू एजाज पटेलने ही जोडी तोडली. त्याने प्रथम मयंक अग्रवालला त्यानंतर चेतेश्वर पुजाराला बाद केले. मयंकने ९ चौकार आणि एका षटकारासह ६२ तर पुजाराने ६ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू रचिन रवींद्रला मोठा फटका खेळण्याच्या नादात गिल बाद झाला. तर रचिन नेच विराटचा अडथळा दूर केला. गिलने ४ चौकार आणि एका षटकारासह ४७ तर कोहलीने ३६ धावा केल्या त्यानंतर आलेल्या फलंदाजांमध्ये अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा चोपल्या. भारताने आपला दुसरा डाव ७० षटकात ७ बाद २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला ५४० धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडकडून एजाजने ४ तर रचिनने ३ बळी घेतले.