नेपाळ पोलिसांचा गोळीबार, एका भारतीय नागरिकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता
पिलीभीत (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशमधील पिलीभीत जिल्ह्याला लागून असलेल्या नेपाळच्या (Nepal) सीमेवर नेपाळपोलिसांनीभारतीयांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. तर दोघे बेपत्ता झाले आहेत. पिलीभीतचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी सांगितले की, तीन भारतीय नागरिक नेपाळमध्ये गेले होते. तिथे नेपाळ पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर नेपाळ पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला.
पिलीभीत जिल्ह्याला लागून असलेल्या नेपाळच्या सीमेवरील टिल्ला क्रमांक ४ गावातील रहिवासी असलेले गोविंदा आपले मित्र गुरमेज आणि पप्पूसोबत नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान, संध्याकाळी नेपाळ पोलिसांनी गोविंदा यांना चकमकीत ठार मारल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोविंदा यांच्यासोबत गेलेल्या दोन मित्रांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
या घटनेनंतर भारत आणि नेपाळच्या सीमेवर एसएसबीला अलर्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी पिलीभीतचे पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी सांगितले की, तीन भारतीय नागरिक नेपाळमध्ये गेले होते. तिथे तांचा नेपाळ पोलिसांसोबत काही कारणांवरून वाद झाला. यादरम्यान नेपाळ पोलिसांनी झाडलेली गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला.
जयप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणासोबत असलेल्या दोन साथीदारांपैकी एक नेपाळमध्ये आहे. तर दुसरा भारतात आला आहे. मात्र अद्याप दोघेही बेपत्ता आहेत. घटनास्थळावर एसडीएम, सीओ यांच्यासह ठाण्यामध्ये पोलीस उपस्थित आहेत. तसेच घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा तणाव नाही आहे. मात्र सुरक्षा दले सतर्क आहेत. तसेच आम्ही नेपाळ पोलिसांच्या संपर्कात आहोत, असे जयप्रकाश यांनी सांगितले.