राजकारण

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना अटक

कोरोना नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमविल्याप्रकरणी कारवाई

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शनिवारी पुण्यातील राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊन तसेच कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. नंतर रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. कोरोना नियमांचा भंग केल्याबद्दल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळालं होतं. या संपूर्ण प्रकरणात आयोजकांवर कारवाई करा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कार्यक्रमातच गर्दीबद्दल जाहीरपणे खंत व्यक्त करणाऱ्या आमच्या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे, जी काही कायदेशीर कारवाई आहे त्याला आम्ही शांतपणे सामोरे गेलो आहोत, कायद्याचा सन्मान ठेवतो आहोत, पण भाजपाच्या नेत्यांनी कोरोना ऐन टिपेला असताना मंदिरे खुली करा, परिक्षा घ्या, शाळा महाविद्यालये सुरू करा म्हणून बेभान होत जी आंदोलने केली ती आठवावीत. फडणवीस, चंद्रकांत पाटील हे राज्याचे नेते आहेत, त्यांच्यावर कशीही काहीही टीका करावी ही आमची राजकीय संस्कृती नाही. त्यांनीच या विषयावर आत्मपरीक्षण करावे आणि विचार करावा, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button