मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या लहानपणी घेतलेल्या मालमत्तांवर सोमय्या बोलत आहेत. खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्ही ७५ वर्षे घरातच बसलो होतो का? आम्ही काय बोळ्याने दूध पित होतो का? आम्ही काही कामधंदा केलाच नाही का?; असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. सोमय्यांच्या सर्व आरोपांचं भुजबळ यांनी आज खंडन केलं. आमच्यावर कारवाई झाली जप्तीही झाली. सर्व बाबतीत हायकोर्ट, सेशन कोर्टात लढत आहोत. वारेमाप आरोप करायचे धंदे सुरू आहेत. अरे आमचं वय ७५ आहे. त्यावेळी आम्ही लहान असताना १० हजार, १५ हजार एकराने घेतलेल्या जागांची आता किमंत वाढली. तुम्ही त्या जमिनीची किंमत आताच्या भावाने सांगता. जणू काही आम्ही ७५ वर्षे घरातच बसलो होतो का? आम्ही इतके वर्षे काय बोळ्याने दूध पित होतो का? आम्ही कामधंदा केला नाही केला का? लोकांवर खोटे आरोप करण्याचे तुझ्यासारखे धंदे आम्ही केले नाही. ही मीडिया ट्रायल थांबवली पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.
आज सोमय्या जे काही सांगत आहेत. त्या चार पाच वर्षापूर्वीच्या केसेस आहेत. त्या संदर्भात ईडीने मालमत्ता जप्त केल्या आहेत. आज ते एका जमिनीबाबत बोलले. नाशिकपासून २० किमी लांब लहानसा रस्ता होता. १९८० मध्ये ही जमीन घेतलेली आहे. शिळ्या कढीला उत आणण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणी सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केसेस सुरू आहेत. त्यांचा काय हेतू आहे माहीत नाही. त्या केसेसवर प्रभाव टाकण्याचा हेतू आहे का? हे माहीत नाही. याबाबत काय कारवाई करायची त्याबद्दल आम्ही वकिलांना विचारू. हे सर्व जुनं प्रकरण आहे. त्यांच्या हातातच सर्व यंत्रणा आहेत. त्यांनी कारवाई केली. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही लढत आहोत. यावर आम्ही अधिक बोलणार नाही. एवढेच सांगेल त्यांनी सर्व आरोपात काडीचंही सत्य नाही, असं ते म्हणाले.
भुजबळ यांना त्यांच्या सांताक्रुझ येथील इमारतीबाबतही विचारण्यात आलं. त्यावर, ते आमचं जुनं घर आहे. ते पाडून बांधण्यात आलं आहे. २.५ एफएसआय मिळतो. त्या पुनर्बांधणीच्या स्किममधली ती वास्तू आहे. त्यातील अर्धे गाळे मूळ मालकाला द्यायचे आहेत. तर अर्धे आमच्याकडे राहणार आहेत. कोर्ट कचेऱ्या चालू असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.