
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांनी इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना आधी आपला मुलगा काय करतो हे पाहावं, असा घणाघाती हल्ला नवाब मलिक यांनी चढवला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर जोरदार टीका केली. मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सने छापेमारी केली होती. त्यात त्यांना काही मिळाले नाही. दोन वर्ष झाली तरी या प्रकरणी कारवाई झाली नाही. आज सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, ते बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने करत आहेत. सोमय्या यांना कोणीही सीरियस घेत नाही. स्वत:चा बडेजाव निर्माण करून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचं काम ते करत आहे. इतरांच्या पोरांवर बोट दाखवत असताना स्वत:ची मुलं काय करतात याकडे लक्ष द्या. मुलगा कुणाला फोन करतो, कुणाला खंडणी मागतो, तुमचे नातेवाईक काय करतात, त्यांच्या किती बोगस कंपन्या आहेत, ते कसं मनी लॉन्ड्रिंग करतात हे पण लोकांना माहीत आहे, असं मलिक म्हणाले.
सोमय्या यांनी काही भाजपच्या नेत्यांच्या कंपन्यांचीही नावे घेतली होती. त्यामुळे त्या नेत्यांचं पद गेलं. त्या काळात त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याबाबत सर्वात जास्त पत्रकार परिषद घेऊन हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळांना कोर्टाने दोषमुक्त केलं. म्हणजेच राजकीय हेतूने बिनबुडाचे आरोप करायचे, बदनामीचे कटकारस्थान करायचे आणि सरकारला, मंत्र्यांना बदनाम करायचं हे उघड झालं आहे. काही दिवसांपासून पुन्हा सोमय्या सक्रिय झाले. केंद्राने त्यांना ४० पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी दिला आहे. त्यांना धोका नसताना ही सुरक्षा निर्माण करून लोकांमध्ये वेगळं वातावरण करण्याचं काम भाजपकडून होत आहे, असं ते म्हणाले.
आता सोमय्या डर्टी ११ सांगत आहेत. या सरकारमध्ये ११ लोकं भ्रष्टाचारी असल्याचं सांगून राजकीय हेतूने सरकारला बदनाम करण्यासाठी वारंवार ते बोलत आहेत. त्यांच्या आरोपत तथ्य नाही. मागच्या काळात जे आरोप केले त्यातून लोक दोषमुक्त होत आहेत. सरकारचा वापर करून भुजबळांना अटक केली. गुन्हा दाखल करण्यात आला. शेवटी सत्य समोर आले. ते दोषमुक्त झाले. आज त्यांनी मुश्रीफांवर आरोप केला. आमच्या पक्षात अनेक नेते उद्योगधंदे करतात. त्यासाठी रितसर ज्या परवानग्या ते घेतात. जी जी एजन्सी आहे, कार्पोरेट अफेयर्स डिपार्टमेंटमध्ये त्याची नोंद होते. इन्कम टॅक्समध्ये रिटर्न फाईल होते, असंही त्यांनी सांगितलं.
राणेंवरील आरोपाचं काय झालं?
तुम्ही भाजपमध्ये असताना नारायण राणेंवर बोट दाखवलं होतं. राणेंनी खोट्या कंपन्या तयार केल्या, त्यांन मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. आता या प्रकरणावर सोमय्या गप्प का?, असा सवालही त्यांनी केला.