मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. माझ्या जावयाच्या घरात ड्रग्स सापडल्याचा खोटा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याबाबत फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. मात्र जर त्यांना अशी माहिती असेल तर त्यांनी ते मुख्यमंत्रिपदी असताना आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना का कारवाई केली नाही, असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, गेल्या २६ दिवसांमध्ये मी दोन महिलांशिवाय कुठल्याही महिलांची नावे घेतलेली नाही. त्या दोन महिलांची नावे घेतली कारण त्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. आमच्यावर महिलांवर आरोप करतो म्हणून बोलतात. मात्र यांच्या घरातील महिला आई, बहिणी आणि इतरांच्या आई बहिणी या आई बहिणी नाहीत का? काल सोमय्यांना अजित पवारांच्या कुटुंबातील महिलांचा उल्लेख केला. संजय राऊत, एकनाथ खडसेंच्या पत्नीलाही बोलावले गेले. उद्धव ठाकरेंच्या पत्नीवर गंभीर आरोप केला गेला, त्याला काय म्हणायचं?
फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरातून गांजा सापडल्याचा आरोप केला. मात्र ही बाब खोटी आहे. येथील पंचनामा मागवा म्हणजे तुम्हाला सत्य काय आहे ते दिसेल. माझ्या जावयाच्या घरातून ड्रग्ससारखी एकही आक्षेपार्ह वस्तू जप्त झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.
दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मात्र माझी ६२ वर्षे मुंबईत गेली आहे. असा आरोप करण्याची कुणाची हिंमत झालेली नाही. माझं घर काचेचं नाही. तसेच माझ्याकडे कुठला शिशमहलही नाही. त्यामुळे मी घाबरत नाही. बाकी तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा गृहमंत्रालयही तुमच्याकडे होते. तेव्हा अशा प्रकरणाचा तपास का केला नाही असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘नकली देवेंद्र’चा वावर
फडणवीस मुख्यमंत्री असताना एक नकली देवेंद्र शहरात फिरत होता, तेव्हा मी फडणवीसांना खबरदारीचा सल्ला दिला होता. त्याकाळा ४ सिझन हॉटेलमध्ये मोठ्या पार्ट्या व्हायच्या. त्यात एका टेबलची किंमत १५ लाख होती. १५ कोटींच्या पार्ट्या व्हायच्या. त्या काळातले सीसीटीव्ही मी जारी केले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. समझदार को इशारा काफी है, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.
महिन्याभरात कोट्यवधींचे कपडे; मलिकांनी वानखेडेंची पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला
क्रूझ ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडेंवर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं आरोप करत आहेत. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. वानखेडेंनी खासगी आर्मी उभारली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार सुरू होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
एनसीबीमध्ये रुजू होताच वानखेडेंनी स्वत:ची खासगी आर्मी उभारली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुशाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसुझा यांचा समावेश होता. या सगळ्यांच्या माध्यमातून शहरात ड्रग्जचा व्यवसाय सुरू होता. लहान प्रकरणं मोठी करून दाखवायची आणि मोठ्यांना सोडायचं, असे उद्योग या आर्मीकडून सुरू होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
समीर वानखेडे अतिशय प्रामाणिक अधिकारी असल्याचं काही जण म्हणतात. मात्र गेल्या महिन्याभरात त्यांनी वापरलेल्यांची कपड्यांची किंमत ५ ते १० कोटी रुपयांच्या घरात आहे. वानखेडे कधीही त्यांचे कपडे रिपीट करत नाहीत. दररोज ते नवीन कपडे वापरतात. देशातील सगळ्या प्रामाणिक लोकांना वानखेडे यांच्यासारखं जगता यावं. सगळ्या प्रामाणिक व्यक्तींची जीवनशैली त्यांच्यासारखी व्हावी, असं मलिक म्हणाले.
समीर वानखेडेंनी गेल्या महिन्याभरात ५ ते १० कोटींचे कपडे वापरले आहेत, असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे २ लाखांचे बूट, ७० हजारांचे शर्ट, ३० हजारांचे टी-शर्ट, १ लाखाची पँट वापरतात. ते वापरत असलेल्या घड्याळ्यांची किंमत २० लाखांपासून १ कोटीपर्यंत आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याची ही जीवनशैली आहे. सर्व प्रामाणिक व्यक्तींनी अशाच प्रकारचं जीवन जगता यावं. राहणीमान आणि कपड्यांच्या बाबतीत वानखेडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील मागे टाकलं आहे, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला.