Top Newsराजकारण

क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही नवज्योत सिंग सिद्धूंचे ‘कॅप्टन’विरोधात बंड !

चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर अखेर ‘कॅप्टन’ यांना पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे क्रिकेट असो वा राजकारण सिद्धू यांचं कॅप्टन विरोधात कायम बंड राहिल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

पुढील वर्षी पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परंतु सिद्धू यांनी आतापासूनच धुवाँधार बॅटिंग सुरू करायला सुरुवात केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर सिद्धूंनी जशी फटकेबाजी केली, तशीच फटकेबाजी ते राजकीय मैदानावर करत आहेत. सिद्धूंची खासियत म्हणजे ते धक्कातंत्रात वाकबगार आहेत. काँग्रेसमध्ये आल्यानंतर अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात गेले. मात्र काही काळानंतर त्यांना वनवासात राहावं लागलं. पण वनवासात गेल्यानंतर शांत बसतील ते सिद्धू कसले? या काळात अमरिंदर सिंग यांना कशी मात द्यायची याचा विचार केला. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आणि सिद्धू यांनी अशी काही खेळी खेळली की आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पायउतार व्हावे लागले.

राजकारणच नव्हे तर क्रिकेटमध्येही सिद्धूंचं कॅप्टनशी कधी पटलं नाही. १९९६ मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वातील टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. मात्र, या दौऱ्यातून सिद्धू अचानक भारतात परतले. कुणाला काहीही न सांगता सिद्धू भारतात आले. त्यामुळे बीसीसीआयने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीत मोहिंद अमरनाथही होते. अझहरुद्दीन नेहमी सिद्धूंना आईवरून काही तरी टोमणे मारायचे. त्यामुळे नाराज होऊन सिद्धू भारतात परतले होते, असं अमरनाथ यांनी सांगितलं. पण ती शिवी नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अझहर जो शब्द वापरत होते. तो शब्द हैदराबादमध्ये आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम दाखवण्यासाठी वापरला जातो. ही माहिती मिळाल्यानंतर सिद्धू आणि अझहरमधील दुरावा कमी झाला आणि त्यांची चांगली मैत्रीही झाली होती.

सिद्धू २००४ मध्ये राजकारणात आले होते. भाजपमधून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूंना भाजपमध्ये आणलं होतं. ते तीन वेळा अमृतसर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये त्यांना जेटलींसाठी आपली सीट सोडावी लागली होती. मात्र, असं असलं तरी सिद्धूंसाठी जेटली हे त्यांचे कायम राजकीय गुरु राहिले आहेत.

सिद्धूंना २०१४ मध्ये लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. परंतु, सिद्धूंना ते काही आवडलं नाही. त्यांनी २०१७ मध्ये राज्यसभेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच वर्षी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी त्यांना अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलं. मात्र अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

थेट पक्षश्रेष्टींशी संवाद

काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर सिद्धूंनी पंजाबमध्ये उचल खाल्ली. त्यांनी सुरुवातीला अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारलं. पंजाबचा प्रदेशाध्यक्ष बदलावा म्हणून त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना आपल्या बाजूला केलं. यात कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा, सुखबिंदर सिंह सरकारिया, सुखजिंदर सिंह रंधावा आदी नेत्यांना आपल्या कळपात सामिल केलं. परगट सिंग, कुलबीर जीरा आदी आमदारांनाही त्यांनी आपल्याकडे खेचून आणलं. अमरिंदर सिंग यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. सिद्धूंच्या या बंडाला काही प्रमाणात काँग्रेस हायकमांडनेही बळ दिलं. सिद्धू हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय मानले जातात. अमरिंदर सिंग यांच्याशी काहीही वाद झाला की ते थेट प्रियंका गांधींना जाऊन भेटतात.

पंजाबच्या मतदारांचा कल समजून घेण्यासाठी काँग्रेसने एक सर्व्हे केला होता. त्यामुळेच काँग्रेसने सिद्धूंकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे दिली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांची काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांची ही नाराजी दूर करण्यासाठीही काँग्रेसने सिद्धूंना बळ दिलं. जनतेच्या मनातील प्रश्नच सिद्धू विचारत होते. जनतेच्या मनातील काँग्रेसविरोधीतील लाट कमी करण्यासाठीच काँग्रेसने सिद्धूंना पुढे केल्याचंही सांगितलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button