नाशिकच्या लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

नाशिक : आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचा जामीन अर्ज आज पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तसेच जामीन अर्ज फेटाळत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला.
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या जानिमाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच ठाणे लाचलुचपत विभागाची अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने झनकर यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिलाय. तसेच या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जाचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.




