
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १००० कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मोदी दिलदार आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्राला १५०० कोटींची मदत करतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हाणला आहे.
ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील नेते हे दिलदार असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी १५०० कोटींची मदत देतील, असे संजय राऊत यांनी म्हटले. पंतप्रधानांनी गुजरातला तत्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल, अशी आशा मी करतो. पण महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे १५०० आणि ५०० कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे तेदेखील केंद्र सरकारला कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती देतील. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.