महाड : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे खळबळजनक आणि वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी केले. दरम्यान, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे, असे म्हणत सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, या शब्दांत राणे यांनी हल्लाबोल केला.
मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी
मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एक नवीन शहर विकसीत होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच शाळा, रुग्णालय, कॉलेजही येणार आहे. यामुळे येथील विकासाला गती मिळणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला.
चिपळूणमध्येही राणेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी टीका
राणे यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. चिपळूणमधील महपुराची पाहणी करण्यासाठी राणे आले असता, त्यांनी एका अधिकाऱ्याशी बोलताना सीएम बीएम गेला उडत असं वक्तव्य केलं होतं. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले होते की, तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.
नारायण राणेंवर गुन्हा दाखल
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १५३, १८९, ५०४, ५०५(२) आणि ५०६ प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तसेच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअतंर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.