
मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणावरून देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे पटोले यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना हा बॉम्ब टाकला. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.
पॅगेसास प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी उद्या गुरुवारी आम्ही राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत. याप्रकरणी राज्यपालांना निवेदन देणार आहोत. या प्रकरणात राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि या प्रकरणाची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.