अबुधाबी : यंदाच्या टी20 विश्वचषकातील सामने अतिशय चुरशीचे सुरु असून काही धक्कादायक निर्णय़ही समोर येत आहे. टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात ५ वेळा भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानने भारताला नमवलं. तर सर्वाधिक वेळा टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव चाखावा लागला आहे. त्यानंतर आता प्रथमच सुपर १२ मध्ये पोहोचलेल्या नामिबाया संघाने स्कॉटलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेत त्यांनी भारत, न्यूझीलंड या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.
अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या या सामन्यात नामिबीयाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडचे तीन फलंदाज पहिल्याच षटकात माघारी परतले. नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅननं यानं पहिल्याच चेंडूवर जॉर्ज मुन्सी ( ०) चा त्रिफळा उडवला. तिसऱ्या चेंडूवर कॅलम मॅकलीओड ( ०) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रिची बेरींगटन ( ०) हाही बाद झाला. रुबेननं पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत इतिहास घडवला. पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या षटकात तीन विकेटस् घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. या धक्क्यांतून सावरताना स्कॉटलंडनं मिचेल लिस्क ( ४४) व ख्रिस ग्रेव्हेस ( २५) यांच्या भागीदारीच्या जोरावर ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. नामिबियाकडून रुबेननं १७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याला जॅन फ्रायलिंक ( २-१०), जेजे स्मिथ ( १-२०) व डेव्हिड विज ( १-२२) यांची उत्तम साथ मिळाली.
प्रत्युत्तरात क्रेग विलियम्स व मिचेल व्हॅन लिंगेन यांनी नामिबियाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, शाफियान शरिफनं लिंगेनला १८ धावांवर बाद केले. झेन ग्रीन ( ९) व कर्णधार गेरहार्ड इरास्मस ( ४) हे झटपट माघारी परतल्यानं नामिबियाची अवस्था बिकट झाली होती. विलियम्सन २३ धावांवर माघारी गेल्यानंतर त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मात्र, डेव्हिड विज व जेजे स्मिथ यांनी खंबीरपणे सामना केला. विज फॉर्मात होताच आणि त्याची विकेट मिळवण्यासाठी स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी सर्व प्रयत्न केले. अखेर विजयासाठी अवघ्या ७ धावा हव्या असताना विज १६ धावांवर बाद झाला, परंतु स्मिथनं नाबाद ३२ धावा करून नामिबियाला ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. स्मिथनं विजयी धाव हवी असताना खणखणीत षटकार खेचला.
या विजयासह नामिबियानं ग्रुप २ मध्ये २ गुणांची कमाई करताना .५५० नेट रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. टीम इंडिया, न्यूझीलंड आणि स्कॉटलंड यांची पाटी अजून कोरीच आहे. स्कॉटलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरल्यानं त्यांचे उपांत्य फेरीमधील आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे.